हंपी ची सोलो सफर !!!
हंपी ची सोलो सफर !!!
नवीन जॉबला लागुन पुर्ण एक वर्ष झाला होता, आणि या एक वर्षात कुठे मोठी ट्रिप झालीच नाही. मन कासावीस होत होतं. बरेच दिवस ब्लॉग वर पण काही लिहीले नव्हते. म्हणुन विचार केला जाऊन येतोच आता कुठेतरी. मी बहुतेक वेळा सोलो ट्रॅव्हल करतो. महाराष्ट्र तर आता पुर्ण फ़िरुन झाला होता, म्हणुन यावेळी महाराष्ट्रच्या बाहेर जायचा विचार होता. माझी बकेट लिस्ट ओपन केली, त्यात बरीच ठिकाणं बाकी आहेत. सोलो ट्रॅव्हल, बजेट ट्रॅव्हल, फोटोग्राफी, लांबची ट्रिप, सध्याचं वातावरण आणि नवीन ठिकाण, या सर्व गोष्टिंचा विचार करुन कर्णाटकला हंपील जायचं ठरलं.
हंपीची बरीच माहीती आधीच जमा करुन ठेवली होती. आठवडाभराची सुट्टी घेतली आणि रविवारी बोरिवली वरुन बस पकडली. ती सकाळी हॉस्पेटला पोहोचते. तिथुन रिक्शा किंवा बस करुन हंपील जाता येते. हंपीला राहण्यासाठी दोन बाजु आहेत. तुंगभद्रा नदिच्या या बाजुला आणि नदिच्या पलीकडे (हिप्पी आयलंड). मी नदिच्या पलीकडे राहण्याचे ठरवले होते. अतीशय सुंदर परिसर आहे तिथे. नदी, डोंगर, नारळांची झाडं, भाताची शेती आणि शांत वातावरण. माझ्यासारख्या सोलो ट्रॅव्हलर साठी ती एक परिपुर्ण जागा होती. माझ्यासारखेच देश-विदेशातले अनेक भटके तिथे पडुन असतात.
नदिच्या पलीकडे, एका विशिष्ट गोल आकाराच्या बोटीने जावे लागते. या प्रकारच्या बोटिंचा इतिहास खुप जुना आहे. इथले लोक खुप आधिपासुन अशा बोटिंचा उपयोग मासेमारी आणि प्रवास करण्यासाठी करत आहेत. या बोटिने प्रवासाचा अनुभव एकदम वेगळाच होता. पलीकडे जाऊन एक स्कुटी रेंटवर घेतली आणि राहण्यासाठी जागा शोधु लागलो. एकटाच होतो म्हणुन लगेचच एक चांगली जागा मिळाली. तसे ते एका रात्रीसाठी ५०० ते ७०० रुपये घेतात. पण मी त्यांना त्यांच्या जागेचे ३६० डिग्री फ़ोटो काढुन देण्याचे पटवून दिले आणि म्हणुन त्यांनी मला एका रात्रीचे १५० रुपये प्रमाणे रहायची सोय केली. सोयही अप्रतीम, आंब्याच्या झाडाखाली एक लहानशी झोपडी. मातीने सारवलेली.
९ वाजता नाश्ता वगैरे करुन स्कुटी घेऊन बाहेर निघालो. पहिल्या दिवशी हिप्पी आयलंड वरिल ठिकाणं फ़िरण्याचं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे अंजनेया हिल (हनुमानाचे जन्म स्थान), दुर्गा मंदिर, वालिकिल्ला गुंफ़ा (सुग्रिव गुंफ़ा), शंमुखा मंदिर, तुंगभद्रा कालवा ही सर्व ठिकाणं फ़िरलो, प्रत्येक ठिकाणचं ऎतिहासिक महत्व वेगळं. आणि नंतर मार्च महिन्यामध्ये सुद्धा वाहणारा लाहान पण आल्हाददायक हंपी धबधबा. दिवसभर फ़िरल्यानंतर या धाबधाब्यात डुंबुन निघालो कि एकदम बरं वाटायचं. रोज संध्याकाळचा कार्यक्रम ठरलेला होता. धबधब्यामध्ये आंघोळ आणि सुर्यास्त, हिप्पी आयलंड वरुन सुर्यास्त खुप सुंदर दिसतो. सोबत भारता बाहेरुन आलेले पाहुणे आपली संगित वाद्य घेऊन गाणी गात असतात. हंपीतील सध्याकाळ खुप सुंदर असते. सुर्य मावळला कि रुम वर यायचो, आणि तिथे सर्व वेगवेगळ्या देशातले अनोळखी लोक जुन्या मित्रांसारखे गप्पा मारत असतात. रात्री झोपे पर्यंत आम्ही एकमेकांना आपापले अनुभव, नविन नविन जागांची माहिती सांगत होतो.
मी खुप थकलेलो म्हणुन लवकरच झोपलो, आणि दुसऱ्या दिवशी लवकर निघुन बऱ्याच जागा फ़िरायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजताच रुम वरुन निघालो. आज नदिच्या पलीकडचं म्हणजे विजय नगरची खरी राजधानी बघायची होती. नदी पलिकडे जाताच तिथे विरुपक्ष मंदिरातील हत्तीण लक्ष्मी आंघोळ करत होती. तुम्ही जर मराठी मुव्ही हंपी पाहिला असेल तर तुम्हाला आठवेल त्यात सुद्धा तो सिन दाखवला आहे.
आज मला स्कुटीची गरज नव्हती, कारण आज बरीच मंदिरं अशी होती की जिथे गाडी पोहोचु शकत नाही. म्हणुन मी सायकल रेंटवर घेतली. (१५० रुपये पर डे). सर्वात आधी मी भेट दिली ती सरळ विजय विठ्ठल मंदिरला, कारण तो सर्वात लांब होता. आणि सर्वांत प्रसिद्ध सुद्धा. हा विठ्ठल मंदिर आणि तिथे असलेलं स्टोन चॅरेट, म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्क्रुष्ठ नमुना. तेथील स्टोन चॅरेटला आपल्या ५० रुपयाच्या नविन नोट वर सुद्धा स्थान मिळाले आहे. हंपी ला वर्ल्ड हेरिटेज साईटची मान्यता मिळाली आहे. म्हणुन हंपी बघण्यासाठी देश-विदेशातुन लोक येत असतात, पण मी सुट्टीच्या दिवसात न जाता मधल्या दिवसांत गेलो होतो म्हणुन तिथे लोकांची गर्दी काहीच नव्हती, म्हणुन मला पाहिजे तेवढे आणि पाहिजे तसे फ़ोटोस काढायला मिळाले. खासकरुन ३६० डिग्री फ़ोटोस. मी गुगल मान्यता असलेला ३६० फ़ोटोग्राफ़र आहे. आणि गुगल मॅप व गुगल स्ट्रिट व्हु साठी ३६० डिग्री फ़ोटोस काढतो. मागच्या वर्षी गणपती विसर्जनानंतर गणपती समुद्रात पुर्ण पृथ्वीवर उभा आहे असा एक ३६० डिग्री फ़ोटो खुप व्हायरल झाला होता. अशी अफ़वा पसरली होती की तो फ़ोटो ड्रोनने काढला होता, पण तो फ़ोटो मीच मझ्या ३६० कमेऱ्याने काढला होता. असो, विठ्ठल मंदिरानंतर मी क्विन्स बाथ, राज दरबार, महानव्हमी डिबा, झना दरबार, लोटस महल, हत्ती शाळा, संग्रहालय, हजरा राम मंदिर, अंडरग्राऊंड शिवा मंदिर, बडविलिंगा मंदिर आणि लक्ष्मी नरसिंह मंदिर ही सर्व ठिकाणं बघितली. दुपारचं जेवण म्हणजे कोणत्यातरी मंदिरात प्रसाद घेतला होता. (सांबार राईस).
तिसऱ्या दिवशी मी मुंबईसाठी निघणार होतो, आणि रुम सकाळीच सोडली होती. म्हणुन दिवसभर नदिजवळील मंदिरं मी फ़िरत होतो. लक्ष्मी तर रोज सकाळी भेटतच होती. आज ती विरुपक्ष मंदिरात सुद्धा भेटली. आंघोळ झाल्यावर ती विरुपक्ष मंदिर परिसरातील सर्व मंदिरांत नमस्कार करुन आपल्या जागी जाते. मंदिरामध्ये एक लहान खोली आहे. खरंतर ती खोली नसुन एक कॅमेरा आहे. कॅमेरा बनण्या अगोदर अशा खोलींचा वापर एखादे चित्र बनवण्यासाठी होत असे. याला पिन होल कॅमेरा सुद्धा म्हणतात. मंदिराच्या दुसऱ्या बाजुला हेमकुटा मंदिर समुह आहे. खुप मोठा परिसर! मी माझा पुर्ण दिवस इथेच घालवला. लहान मोठी अशी बरीच मंदिरं इथे आहेत. प्रत्येक मंदिर वैशिष्टपुर्ण. तिथे गणपतिची दोन मंदिरे आहेत. त्यातील एकात बहुदा गणपतीची सर्वात मोठी मुर्ती असावी (१५ फ़िट). ते मंदिर आणि मुर्ती एकाच दगडात कोरुन बनवलेलं आहे. कडलेकु गणेश असं त्या मंदिराचं नाव.
हंपी मधील बहुतेक मंदिरांत देव नाहीत. काही ठराविक मंदिरांतच तुम्हाला देव मिळतील. विठ्ठल मंदिर सुद्धा रिकामी आहे. इथुनच विठ्ठल रखुमाईची मुर्ती नेऊन पंढरपुरला बसवली आहे असं मानलं जातं. कदाचित म्हणुनच म्हणत असतील, “कानडा, राजा पंढरीचा”.
अशा प्रकारे मी तीन दिवस हंपी मधे होतो. हंपी मध्ये जेवढं फ़िराल तेवढं कमीचं आहे. पावला पावलावर तिथे ऐतिहासिक ठेवा आहे. अॅडव्हेंचर प्रेमींसाठी जणु काही स्वर्गच आहे हंपी. तेथील रॉक क्लायमबींग आणि गुहांमध्ये फिरण्याचा माझा अनुभव विलक्षण होता. रामायणातील सुग्रीवची गुफा आहे तिथे.
तुम्ही कधी हंपीला भेट देण्याचा विचार करत असाल तर कमीत कमी तीन दिवस तरी सोबत ठेवा. आणि हंपी बद्दलच्या सर्व माहिती आणि ठिकाणांसाठी माझ्या ब्लॉगला (
Solo-trip-to-hampi-karnataka) ला जरुर भेट द्या. तेथे तुम्हाला हंपीच्या माहिती सोबत हंपीचे ३६० डिग्री फोटोस सुद्धा पहायला मिळतील.