Bioluminescence | काय आहे कोकणातील निळ्या लाटांचे रहस्य?

साधारण डिसेंबर च्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी सोशल मिडियावर काही फोटो दिसण्यात आले. ते फोटो होते रात्रीच्या अंधारात समुद्रातुन उसळणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटांचे. डिसेंबर महिन्यात जेव्हा थंडी सुरू होत असते तेव्हा अशा निळ्या रंगाच्या लाटा अधूनमधून कोकण किनारपट्टी वर दिसत असतात. मागील ३-४ वर्षांपासून हे प्रमाण वाढले आहे. दर वर्षी कधीकधी दिसणाऱ्या या लाटा या वर्षी रत्नागिरीच्या काही किनाऱ्यांवर ३-४ दिवस सतत दिसत होते. तिथे जाऊन बघावं अशी खुप इच्छा होत होती. पण नेमकं आपल्याला कुठे बघता येईल, बिच कसे असतील, कोरोनामुळे ST पण कोकणात कमी होते, आणि कोकणात रिक्षा ने फिरायचे म्हणजे किती श्रीमंत झाल्यासारखे वाटते हे कोकणी माणसालाच माहिती. मुंबई वरून बाईक घेऊन जायचं आणि रात्रभर जागं राहून पुन्हा मुंबईला यायचं तर ते पण खुप त्रासदायक होतं. म्हणून जाण्यासाठी मी काचकूच करत होतो.
पण एका संध्याकाळी माझ्या संगमेश्वरच्या मित्राला याची कल्पना दिली तर तो तिथे जायला तयार झाला. संगमेश्वर वरून बाईक पण अरेंज करतो म्हणाला. बस आता आणि काय पाहिजे होतं. बिचवर रात्रभर राहण्यासाठी टेंट तर होताच माझ्याकडे.मुंबई ते संगमेश्वर ट्रेन तिकीट काढली. तत्काल तिकीट सुद्धा वेटिंगवर होती. ट्रेन रात्री १२ ची होती आणि तिकिट कन्फर्म होईल की नाही हे ४ तास आधी म्हणजे ८ वाजता समजणार होते. सध्या कोरोना हा फक्त लोकलने प्रवास करणाऱ्या पुरुषांनाच होतो असा कदाचित महाराष्ट्र सरकारचा अभ्यास असावा, म्हणून अजून तरी पुरूषांना लोकल ने प्रवास करण्याची अनुमती सध्या तरी मुंबईत नाही. आणि ३-४ तासांत विरार ते दादर ST ने पोहोचणे तेही मुंबईच्या ट्रॅफिक मधे, हे म्हणजे दिव्यच.
शेवटी रात्री ८.१५ ला तिकीट कन्फर्म झाली. आता वेळेवर दादरला पोहोचण्यासाठी एकच ऑप्शन होता, तो म्हणजे लोकल ट्रेन. जे होईल ते होईल असा विचार करुन भरलेली बॅग आणि टेंट घेऊन सरळ विरार स्टेशनला पोहोचलो. तिकीट काऊंटर वर सांगितलं काय प्रॉब्लेम आहे. माझी दादर ते संगमेश्वर तिकीट रिझर्व्ह आहे आणि तिथे वेळेत पोहचण्यासाठी लोकलने जाणे भाग आहे. पण त्याने आम्ही तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही असे सांगितले.
पण जायचे तर होतेच, कन्फर्म तिकीट पुन्हा मिळेल की नाही माहीत नव्हते. म्हणून सरळ जाऊन लोकल मध्ये बसलो. TC ने पकडलं तर फाइन भरण्याची तयारी होतीच. सुदैवाने दादर पर्यंत TC काही आला नाही. (विरार ट्रेन मध्ये TC कमीच चढतात) माझ्या सोबत माझा लहान भाऊ सुद्धा होता. दोघे वेळेच्या आधीच दादरला पोहोचलो. आता रात्रभर प्रवास करुन दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही संगमेश्वर ला पोहोचलो.
तिथे माझा मित्र संदेश आणि त्याचा भाऊ २ बाईक घेऊन आले. संदेश हा मराठी YouTuber आहे. कोकण संस्कृती हा त्याचा Channel. त्याला सुद्धा त्या निळ्या लाटा बघायच्या होत्या. आता संगमेश्वरला होतो म्हणून संदेशने आम्हाला दुपार पर्यंत संगमेश्वर फिरवलं. सुरूवात गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करून झाली. पुढे काही मंदिरं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पण दाखवले. संभाजी महाराजांना पकडण्यात आले तेव्हा ते संगमेश्वर मध्येच होते.
संगमेश्वर येथे दुपारचं जेवण करुन आम्ही ज्यासाठी एवढा प्रवास केला आहे त्या निळ्या लाटा बघण्यासाठी थेट रत्नागिरीकडे निघालो. काही बिचेस ची नावं मला माहीत होती आम्ही तिथे तिथे जाऊन निळ्या लाटांबद्दल विचारपूस केली, काही लोकांना त्याबद्दल माहिती होती तर काहींनी फक्त फोटो बघीतले होते. गावातल्या बऱ्याच लोकांनी आम्हाला त्या निळ्या लाटांचे खरे रहस्य काय आहे ते सांगीतले. लोकल लोकाशी Tourist सारखं न बोलता मित्रासारखं बोललात तर ते पाहीजे ती सगळी माहिती सहज देतात.
आम्ही गणपतीपुळे पासुन आरे वारे पर्यंतच्या सगळ्या बिचेसवर जाऊन आलो. आणि सगळ्या गोष्टी Analyse करुन असं समजलं की काजीरभाटी या बिचवर त्या निळ्या लाटा जास्त प्रमाणात दिसल्या आहेत. म्हणून आम्ही काजीरभाटी या बिचवर थांबण्याचे ठरवले. तिथे एका दुकानातल्या काकुंना आम्ही जेवणाची ऑर्डर दिली, त्यांनी घरीच जेवायला या म्हणून सांगितलं. रात्री १० वाजेपर्यंत लाटांचे काही दर्शन झाले नाही म्हणून आम्ही १० ते १०.३० मध्ये जेऊन घेतले. नंतर टेंट तयार केला आणि अधुन मधुन दोघे जण जागे राहून दोघे जण आराम करत होतो. काहीच चान्स घ्यायचा नव्हता आम्हाला. १२ वाजत आले तरी आम्हाला त्या निळ्या लाटा दिसत नव्हत्या. असा काही निसर्गाचा चमत्कार बघायचा असेल तर सय्यम ठेवावाच लागतो. आम्ही १-२ वेळा पाण्याच्या जवळ जाऊन सुद्धा पाहीले, पण काहीच दिसत नव्हते. मी wildlife आणि nature photography करत असल्यामुळे अशा failure आणि disappointment ची कल्पना मला होती, पण माझ्या सोबत आलेल्यांना नव्हती.
बिचवर रात्रीचं कोणीच नसतं. भयानक वाटणाऱ्या त्या काळोखात आता आम्हाला आमच्या आजुबाजुचा परिसर पण दिसत होता. जसंकाही पुर्ण बिच आमचाच आहे असं आम्ही वावरत होतो. आणि रात्री २ वाजता तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही पाण्याच्या जवळ गेलो तेव्हा डोळ्यांना विश्वास बसणार नाही अशी घटना घडली. निसर्ग पाहताना एकाच गोष्टीकडे लक्ष देऊन बघायचं नसते ते खरंच आहे. ओलसर वाळूवर उभं राहून जेव्हा आम्ही समुद्राकडे बघत होतो, तेव्हा माझ्या भावाचं लक्ष खाली त्याच्या पायाजवळ गेलं. त्याने लगेच मला बोलवलं, दादा हे बघ काय…
आम्ही सर्व खाली बसुन ते काय आहे ते बघू लागलो. एकदम जवळून बघीतलं तर एक छोटासा लाईटचा ठिपका तिथे चमकत होता. मी ते उचलून बघीतलं, वाळूच्या कणाहूनही लहान होता तो ठिपका आणि मधे मधे त्यातुन निळसर प्रकाश चमकत होती. सगळेच खूष झाले. कारण जे आम्ही समुद्रात शोधत होतो ते कधीपासुन आमच्या पायाखालीच होतं. मग लाटा सोडून आम्ही खाली वाळूतच आमचं लक्ष केंद्रित केलं. जेवढं जास्त वेळ आम्ही बघत होतो तेवढं जास्त ते प्रकाश करणारे दिसू लागले.
आनंदी आनंद गडे म्हणून जिकडे तिकडे चोहीकडे आम्ही ते प्रकाश करणारे जिव शोधू लागलो. तेव्हा असं जाणवलं की आम्ही जिथे जिथे पाऊल ठेवत आहोत तिथेच आजुबाजुला ते प्रकाशमान होत आहेत. म्हणून आम्ही वेड्यासारखे इथे तिथे उड्या मारु लागलो. ज्याच्यासाठी आलो आहोत ते वेगळ्याच प्रकारे आम्हाला दिसल्यामुळे, खुषी के मारे उड्या तर मारतच होतो, पण जिथे उडी मारु तिथली जागा प्रकाशित होत होती. जिथे चालू तिथे लाईट पेटत होती, हे सर्व पहिल्यांदाच आम्ही अनुभवत होतो. यापुर्वी असं काही पाहीलं नव्हतं कि ऐकलं नव्हतं. सोशल मिडिया वर जे फोटो पाहून आम्ही इथे आलो होतो हे तर त्याच्या कित्येक पट भारीच होतं.

इथे येण्याआधी मी याचा थोडा अभ्यास केला होता. खरंतर या चमकणाऱ्या लाटा म्हणजे त्यासोबत वाहणारे हे सुक्ष्म जिवच असतात. त्यांचे शास्त्रीय नाव आहे #Noctiluca. मराठी मध्ये याला प्लवंग सुद्धा म्हणतात. यांमध्ये जैविक प्रकाश म्हणजेच #Bioluminescence निर्माण करण्याची क्षमता असते. तापमान बदलामुळे व तळसमुद्रातील खाण्याच्या कमतरतेमुळे हे जिव कोकण किनारपट्टीवर येतात. जेव्हा या सुक्ष्म जिवांवर कोणत्याही प्रकारचा आघात होतो तेव्हा ते चमकू लागतात. समुद्रात जेव्हा लाटा उसळत असतात तेव्हा हे जिव लाटांच्या कंपनांमुळे प्रकाशीत होतात आणि त्यामुळे आपल्याला लाटा चमकत असल्याचा भास होतो.
भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्यामुळे हे जिव किनाऱ्यापर्यंत पोहोचतात. पण अहोटी होत असताना त्यातले काही जिव वाळू सोबत किनाऱ्यावरच पडून असतात. दिवसा त्यांचा प्रकाश आपल्याला दिसत नाही, आणि रात्री ते विखुरलेले असल्यामुळे त्यांचा प्रकाश सहज डोळ्यांना जाणवत नाही. किनाऱ्यावर ते काही micro seconds साठी ते चमकतात. त्यामुळे त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ पण काढता नाही आले. बराच वेळ हे सर्व बघून झाल्यावर काहीतरी वेगळं अनुभवल्याचं समाधान आमच्यात होतं. पण फोटो व्हिडिओ काढता येत नव्हते म्हणून थोडी disappointment होतीच. मग आम्ही विचार केला कदाचित भरती आल्यावर जेव्हा हे समुद्राच्या लाटांमुळे जास्त प्रमाणात चमकायला लागतील तेव्हा चागले फोटो काढता येतील. तेव्हा जवळ जवळ सकाळचे ४ वाजत आले होते, आणि जोपर्यंत पाणी त्या सुक्ष्म जिवांपर्यंत आलं तो पर्यंत सुर्य उगवायला लागला होता. ६ वाजेपर्यंत आम्ही वाट बघीतली, पण भरती काही आली नाही आणि त्या लाटा काही त्या सुक्ष्म जीवांपर्यंत पोहोचल्या नाहीत. जसं सुर्य दिसायला लागला तसं आम्ही निघायची तयारी सुरू केली. आमचा टेंट बघून तिथे येणाऱ्या गावातल्या लोकांना त्याचं कुतुहल वाटत होतं.
शेवटी नविन अनुभव आणि बराच अभ्यास गोळा करुन आम्ही घरी निघालो. संदेश संगमेश्वरला त्याच्या घरी गेला व मी आणि माझा भाऊ आम्ही आमच्या गावी सिंधुदुर्गात आलो. आता इथे थोड्या गोष्टी explore करुन आपली Unexplored Konkan या मालिकेत नविन नविन गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत राहीन.

