महाड च्या जंगलात लपलेला अपरिचित असा सातधारा धबधबा
पावसाळा नुकताच चालु झाला होता. सोशल मिडियावर वेगवेगळ्या निसर्गरम्य जागांचे फोटो आणि व्हिडिओ रोज दिसु लागले. पण दर वर्षी तेच तेच धबधबे, तेच ट्रेक्स आणि सोशल मिडिया संस्कृतीमुळे नावाजलेल्या जागांवर होणारी भरमसाठ गर्दी, यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी जाणं टाळलेलंच बरं. म्हणुन पावसाळ्यात निसर्गाचा खरा आनंद घेण्यासाठी मागील काही वर्षांपासून मी नविन जागा शोधण्यास सुरुवात केली. अशा जागा, ज्या लोकांपासुन दुर आणि कोणाला माहित नसतील.

अशातच फेसबुकवर एक फोटो पाहण्यात आला. अप्रतिम असा धबधबा, कोणीतरी तो फोटो पोस्ट केला होता. पण तो धबधबा नक्की कुठे आहे याची माहिती नव्हती, फक्त तो महाडला आहे एवढंच समजलं. सात थरांमध्ये वाहणारा तो धबधबा इतका सुंदर होता मी हा धबधबा शोधून काढण्याचेच ठरवले. तो फोटो एडिट केलेला किंवा हा धबधबा भारता बाहेर कुठेतरी असावा असं वाटत होतं. कारण असं दृश्य मी अजुन कधीही महाराष्ट्रात काय भारतात पण कुठे पाहिलं नव्हतं.
मग शोधाशोध सुरू झाली. महाड मध्ये राहणारे, महाड ज्यांचं गाव असेल असे व इतर भटके लोक, सगळ्यांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण कुणालाच या धबधब्याची माहिती नव्हती.पण काहीच दिवसांत महाड मधीलच एका मुलाचा संपर्क झाला. त्याला तो धबधबा नेमका कुठे आहे ते माहित आहे असे त्याने सांगितले. त्याने लोकेशन वगैरे तर मला सांगितले, पण गावा मध्येही कुणाला या धबधब्याबद्दल माहिती नाही, म्हणुन तिथे स्वतः पोहोचणे मुश्किलच होते. म्हणुन मी त्याला विनंती केली की जर तुला जमलं तर मी महाडला आलो की मला त्या धबधब्यावर घेऊन जाशील का? तर तो म्हणाला कधीही या मी तुम्हाला घेऊन जाईन. हे तर चांगलंच झालं.
पुढच्याच शनिवार रविवारी मित्राच्या गावी, मानगाव येथे कुंभे घाट आणि धबधबा एक्सप्लोर करायला जायचे होते, तिथुन महाड म्हणजे हाकेच्या अंतरावर आहे. म्हणुन आम्ही तेव्हाच तो धबधबा शोधायचं ठरवलं.
शनिवारी सकाळी लवकरच मुंबई वरुन निघालो. वाकणला नाष्टा करुन जास्तं कुठे न थांबता महाडला पोहोचलो. पाऊस तर रात्री पासूनच खुप होता. महाड MIDC येथे माझा नविन मित्र आम्हाला भेटला, जो आम्हाला तो धबधबा दाखवणार होता. त्याने स्वतःची बाईक आणली होती. मग आम्ही त्याच्या मागे मागे, गावागावातुन, पक्क्या-कच्च्या रस्त्यावरुन त्या धबधब्याजवळ पोहोचलो. गाड्या पार्क केल्या, पाऊस अजुनही काही थांबला नव्हता. म्हणुन भिजण्याच्या हिशोबानेच कपडे बदलले. पावसाळी कॅमेरे घेतले, पावसाळी म्हणजे जे पावसात वापरु शकतो असे, GoPro, SJCam असे Waterproof Case असलेले. माझा ३६०॰ कॅमेरा पण घेतला, पण तो Waterproof नसल्यामुळे पाहिजे तसा वापरता आला नाही.आधी वाटले आता इथून थोडंफार ट्रेक करावा लागेल, पण ५ मिनिटांतच आम्ही धबधब्याखाली पोहोचलो.
एकदम अप्रतिम दृश्य. ज्याची एवढे दिवस उत्सुकता लागुन राहिली होती, शेवटी आज त्या धबधब्यासमोर येऊन पोहोचलो. डोंगरात तयार झालेल्या खळगीतुन सुरु होऊन खाली सात थरांमध्ये वाहणारा हा धबधबा आम्ही शोधला.असं निसर्ग सौंदर्य मी याआधी कधी पाहिलं नव्हतं. मी फेसबुक वर त्याचा फोटो शेअर केला. खुप लाइक मिळाले खुप शेअर आणि कमेंन्ट पण झाले. मला या धबधब्याला गुगल मॅप वर लोकेट करायचा विचार होता, पण बऱ्याच निसर्ग प्रेमींनी सांगितले की हि अशी सुंदर जागा लोकांपासून दुरच राहूदे. नाहीतर इतर सुंदर जागांचे जसे बाजारीकरण झाले आहे तसं या जागेचे पण होईल. मला पण तसेच वाटले म्हणून मी पण हा धबधबा आणि हे निसर्ग सौंदर्य लोकांपासून लपवून ठेवण्याचेच ठरवले. म्हणुन हि जागा कुठे आहे हे कोणीही विचारु नये. लोकांच्या गर्दीने या जागेची सुंदरता नष्ट होऊ नये हिच इच्छा.
या धबधब्याला नाव नव्हते, सात थरांमध्ये वाहणारा हा धबधबा म्हणुन मी त्याचे सातधारा धबधबा म्हणुन नामकरण केले आहे.