India’s first Sai Temple | भारतातील पहिले साई मंदिर, कविलगाव, कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
कुडाळ रेल्वेस्टेशन पासुन अवघ्या अर्धा किमी अंतरावर साई बाबांचे एक मंदिर असुन हे भारतातील पहिले साई मंदिर अशी ख्याती आहे.
या मंदिराची अख्यायीका अशी की कविलगाव येथील श्री. रामचंद्र रावजी उर्फ दादा माडये हे श्री दत्तमहाराजांचे असीम भक्त होते व त्यांच्या कठोर भक्तीचे फलस्वरुप त्यांना एके दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी साक्षात्कार घडवून तू शिर्डी ला ये असे सांगितले. त्याप्रमाणे शिर्डी येथे गेलेले माडये यांना साई बाबांची भेट घडली व तेव्हाच त्यांना साईस्वरुपात दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडले.
शिर्डीहून परतताना बाबांनी त्यांच्या हातावर एक रुपयाचे नाणे ठेवले व तु आता जा मी तेथेच येत आहे असा संदेश दिला. त्याप्रमाणे कविलगावात आल्यानंतर काही वर्षातच म्हणजे सन १९१८ साली शिर्डी येथे बाबांनी आपला पवीत्र देह ठेवला. आणि त्यानंतर लगेचच दुसर्या वर्षी म्हणजे सन १९१९ साली कविलगावात बाबांच्या अदभुत भक्ती प्रेरणेने प्रेरीत झालेल्या माडये यांनी बाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव साजरा केला. आणि विशेष म्हणजे या उत्सवा करीता साईबाबांनी दिलेल्या एक रुपया उत्सवाच्या संपूर्ण खर्चाकरीता वापरण्यात आला आणि तेव्हापासून बाबांच्या पुण्यतिथी उत्सवास कविलगाव येथे सुरवात झाली आणि तेथुन बाबांचा पुण्यतिथी उत्सव आजतगायत अव्याहात चालु आहे.