My Article Published in News Paper
My article about Turtle Festival was published in Marathi News Paper “Maharashtra Times” .
अंजर्ले आणि वेळासचा कासव महोत्सव.
माझी, कासवांची पिल्लं पाहण्याची धडपड…
दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा “कासव महोत्सव” ला भेट देण्याचे ठरवले. एप्रिल महिन्या मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास गावच्या सुंदर बिचवर हा महोत्सव भरवण्यात येतो.
मागील दोन वर्षांपासुन मी वेळास ला भेट देत होतो, पण एकदाही त्या कासवांच्या पिल्लांचे दर्शन झाले नाही. म्हणून या वर्षी मी ३ दिवस तिथेच तळ ठोकुन रहायचं ठरवलं.
पण घरून निघण्या आधी असे समजले की, वेळासला कासव महोत्सव आणि कासव संवर्धनाची मुहुर्तमेढ रोवणारे कासव मॅन मोहन उपाध्याय आता वेळास सोडुन अंजर्ले ला असतात. अंजर्लेला सुद्धा २०१६ पासुन कासव महोत्सव साजरा करतात. अंजर्लेचे तृशांत भाटकर यांच्याशी फेसबुक वर ओळख झाली आणि अभिनय केळसकर यांना तर मी ओळखतच होतो. अभिनय आणि मोहन उपाध्याय सारखी प्राणी पक्षी मित्र कोणत्या ना कोणत्या जंगलात आणि एक्झिबीशन मध्ये भेटतच असतात.
कासवांची पिल्लं आणि हि दिग्गज मंडळी एकाच ठिकाणी मिळणार होती. मग काय सरळ काढली बाईक आणि निघालो अंजर्लेसाठी. तृशांतमुळे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय झाली. आणि सुरमय असलेलं कोकणी जेवण म्हणजे त्यासारखं जगात दुसरं काही नाही.
अंजर्ले हे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारी वसलेलं एक टुमदार गाव. पर्यटकांची वर्दळ, वाॅटर स्पोर्टस अशा गोष्टिंपासुन लांबच असलेलं हे गाव. जवळ जवळ २ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, कदाचित म्हणूनच आॅलिव्ह रिडले या जातीचे कासव या बिचवर अंडी घालण्यासाठी येतात. समुद्री कासवांच्या सात जातींपैकी हि एक जात. १५-१६ वर्षांपर्वी मोहन उपाध्याय सारख्या लोकांनी वेळास येथे या कासवांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली. आणि तिच प्रथा आता ते अंजर्लेला राबवत आहेत.
हे लोक साधारण डिसेंबर पासुन रात्री बिचवर गस्त घालण्यास सुरुवात करतात. आणि कासवांनी घातलेली अंडी शोधुन तिथुन काढतात आणि बिचवरच बनवलेल्या एका सुरक्षित जागेत ती अंडी तेवढाच खड्डा करून पुन्हा पुरतात. हा सर्व खटाटोप ती कासवांची पिल्लं सुरक्षित अंड्यांतून बाहेर येण्यासाठी. आणि याचे फळ त्यांना मिळते ४५ ते ६० दिवसांनी, जेव्हा ती लहान लहान पिल्लं अंड्यांतून बाहेर येतात आणि समुद्राच्या दिशेने आपल्या आयुष्याची सुरुवात करतात. या पिल्लांना त्या वाळुत आपल्या पावलांची रागोळी बनवत समुद्रात जाताना बघणं हा खरंच एक विलक्षण अनुभव आहे. कदाचित मागिल दोन वर्षांपासुन ही कासवं माझ्यावर रूसुन बसली होती. अंजर्लेमुळे मला हे सर्व अनुभवता आले.
पहिल्या दिवशी ती पिल्लं काही बाहेर आली नाहीत. मग रात्री उपाध्याय, भाटकर आणि केळसकर यांच्यासोबत गप्पा मारत बसलो. माझ्या माहितीत थोडी अजुन भर झाली. सकाळी सर्वात आधिच बिचवर पोहोचलो. आणि तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यादाच मला या छोट्या पाहुण्यांचे दर्शन झाले. धन्य झाल्यासारखे वाटले. तीन दिवसांचे काम दोन दिवसांतच झाले. मग अभिनयच्या बोट मधुन समुद्रात ऐटीत उभा असलेल्या सुवर्णदुर्ग पाहायला गेलो. आणि नशिब एवढं चांगलं, जाताना आणि येताना दोन्ही वेळेस बरेच डॉल्फिन्स बघायला मिळाले. सुवर्णदुर्ग हा एक छान जलदुर्ग आहे. किल्ल्यावर एका बाजुला वटवाघुळांची मोठी वस्ती आहे. किल्ला पाहुन पुन्हा बिचवर आलो. शनिवार रविवार असल्यामुळे पर्यटक जास्त येण्याची शक्यता होती, म्हणून मी दुपारीच निघण्याचे ठरवले. रस्त्यामधे कड्यावरच्या गणपतीला सुद्धा जाऊन आलो. येथे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या पायाचा ठसा आहे. वरुन दिसणारे अंजर्ले आणि दापोलीचे दृश्य मनमोहक आहे.
तिथुन मी घरी येण्यासाठी निघालो, पण मनात वेळास राहुन गेल्यासारखं वाटत होतं. तसे माझ्याकडे अजुन दोन दिवस होतेच, म्हणून मी अर्ध्या रस्त्यातुनच वेळासला सुद्धा जाण्याचे ठरवले. तिथे सुद्धा बरेच लोक ओळखीचे आहेत. मग कुलाबकर यांच्या घरी थांबलो. वेळास मधे बरेच लोक घरगुती जेवण आणि राहण्याची सोय करतात. संध्याकाळी मग माझं नशिब आजमवण्यासाठी वेळास बिचवर गेलो. वाटलं अंजर्लेमुळे माझं नशिब खुललं असेल, पण नाही, या वेळी सुद्धा वेळासच्या कासवांनी माझ्याकडे पाठ फिरवली. असं वाटायला लागलं होतं की, वेळासला मी कासव बघायला नाही तर फक्त कासवांची माहिती घ्यायला येतो. पण त्या सर्व माहितीचा उपयोग झाला. पहिल्यांदाच आलेल्या लोकांना मी बिचवर त्या कासवांची माहिती देत होतो. नविन लोकांच्या ओळखी झाल्या. सर्वांना वाटत होतं की मी तिथलाच आहे. पुण्याचा एक गृप माझ्यासोबत कुलाबकर यांच्याइथेच रहायला होता. रात्री जेवण झाल्यावर गावात फेरफटका मारला, मग नविन मित्रांसोबत वाइल्ड लाइफ आणि ट्रेकिंगच्या गप्पा चालु झाल्या, एकाने तर मला मिच सांधन व्हॅली येथे काढलेला अजगराचा फोटो हे सांगुन दाखवला की, हा फोटो ट्रॅकर्स गृप मध्ये खुप वायरल होतोय. हे ऐकुन खुप बरे वाटले. लोक मला माझ्या फोटोग्राफीमुळे ओळखू लागले आहेत. मग जेव्हा मी त्यांना सांगितले की हा फोटो मिच काढला आहे, तर ते लोक मला एका सेलिब्रेटी प्रमाणे वागवू लागले. सेल्फी वगैरे घेतले. फोटोग्राफीच्या टिप्स वगैरे विचारू लागले. मी म्हणालो, एवढा मोठा फोटोग्राफर नाही आहे मी. मग रात्री दमशराज खेळुन झोपलो.
सकाळी हा विचार करुनच उठलो की, जर आज कासवांची पिल्लं नाही दिसले तर पुन्हा कधिच वेळासला येणार नाही. तो पुण्याचा गृप माझ्या सोबतच बिचवर निघाला. मनात एक विचार आला की, कदाचित मिच अनलक्की असेन, म्हणून इथली कासवं माला दिसत नाहीत. त्यापेक्षा मिच आज बिचवर जात नाही, माझ्यामुळे उगाच एवढ्या लोकांची ट्रिप फुकट जायची. पण तो गृप मला सोबत घेउनच गेला. त्याना वाटत होतं की एक एक्सपर्ट फोटोग्राफर त्यांच्या सोबत आहे. ते विचारत होते की काय कॅमेरा सेटींग ठेऊ? कसे फोटो काढु? मि म्हणालो बिचवर बॅरिगेट्स लावले असतील, तिथुनच कासव समुद्रात सोडतात. तिथे आपला कॅमेरा वगैरे सेट करुन बसुन रहा, कारण नंतर तिथे खुप गर्दी होईल. त्यांच्यासाठी ती एक्सपर्ट अॅडव्हाइज होती. विकेंड असल्यामुळे गर्दी तर होणारच होती. बघता बघता लोकं वाढु लागली. बिचवर खेळत होते, बंदी असून सुद्धा समुद्रात जात होते. लोकं एकदम बेशिस्त आणि बेजबाबदारपणे वागत होते. ही सर्व मंडळी विकेंड ट्रिपसाठीच इथे आलेली, बाकी कासव वगैरे त्यांच्यासाठी अंधश्रद्धा आहे.
शेवटी ती वेळ आलीच, त्या दिवशी चक्क १९ पिल्लं अंड्यांतून बाहेर आली. फोटोग्राफर्ससाठी ती तर एक पर्वणीच होती. बघता बघता बॅरिगेट्स भोवती ४००-५०० लोक जमा झाले. ही इवली इवली पिल्ले जन्मापासुनच स्टार असतात. पण त्या गर्दीला आवरण्यास संयोजकांच्या नाकी नउ येत होते. काही लोक बॅरिगेट्सच्या आत येत होते. कासवांच्या जवळ जाऊन मोबाइलने फोटो काढत होते. संयोजकांवरच ओरडत होते. काही लोक तर कासवांना हातात घ्यायला जात होते. लाटांसोबत कासवांची पिल्लं लोकांच्या पायाजवळ येत होती. एवढासा जिव तो, पायाखाली येऊन त्याचा जिव जाऊ शकतो, हे सुद्धा लोकांना कळत नव्हते. अॅलिव्ह रिडले ही कासवांची जात संरक्षित प्राण्यांमध्ये पहिल्या पातळीत मोडते. सलमानने मारलेला काळवीट हा दुसरा पातळीत मोडतो. म्हणजे जर आपल्यामुळे त्या पिल्लांचा जिव गेला तर आपल्याला सलमान पेक्षा जास्त शिक्षा होईल हे कदाचित त्या पर्यटकाना माहित नसावे.
मी मागे राहुन हा सर्व बेशिस्तपणा पाहत होतो. दुसरा पर्यायच नव्हता. मोहन उपाध्याय सोबत वेळासची शिस्त आणि नियम सुद्धा वेळास सोडुन अंजर्लेला निघुन गेल्यासारखं वाटत होतं. भिती वाटत होती की, वेळासचं वैभव असलेली ही कासवं सुद्धा जर मोहन दादा सोबत निघुन गेली तर? तर वेळास गावातील लोकांचा कासव महोत्सवामुळे होणारा व्यवसाय सुटुन जाईल. कदाचित व्यवसायिकरणामुळेच ही परिस्तिथी जन्माला आली असेल. असो, तो गावातल्या लोकांचा प्रश्न आहे. माझी फक्त मोहन दादाला विनंती आहे की तु गावासाठी नाही तर त्या लहान जिवांसाठी वेळासला परत ये. तुझी तिथे खरच खुप गरज आहे. पुढच्या वर्षी वेळास आणि अंजर्लेला पर्यटकांपेक्षा कासवांची संख्या जास्त दिसुदेत अशी इच्छा मनात ठेऊन मी घरी येण्यासाठी तेथुन निघालो. परतीच्या प्रवासात पनवेलला मला आमचा बुलेटचा गृप “बिआरसी मुंबई (BRC Mumbai)” भेटला. ते सर्व लोणावळाला गेलेले. मग त्यांच्या सोबत विरार पर्यंत्त एकत्र आलो.
अशा प्रकारे हे तीन दिवस मला बरंच काही देवून गेले.
अंजर्ले कासव महोत्सव आणि अशी बरीच ठिकाणं मी माझ्या वेबसाईट वरून लोकांपर्यंत पोहोचवत असतो.

A Born Star

Suvarnadurga Fort

Lord Ganesh’s Footprint at Kadyawarcha Ganpati, Anjarle