Rajwadi Kathi Holi | Akkalkuwa Nandurbar | Unexplored Maharashtra
मित्रानो हि सगळी लगबग, धावपळ दिसते आहे, ती सर्व तयारी होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील काठी होळी ची.
होळी हा सण संपूर्ण देशात मोठ्या जल्लोषात साजरा होतो पण नंदुरबार जिल्ह्यात पार पडणाऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात जुनी परंपरा असलेल्या या राजवाडी किंवा काठी होळीची भव्यता काही वेगळीच आहे.
राजवाडी काठी होळी अशी ओळख असलेली सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी गावी हा होळीचा उत्सव साजरा होतो नंदुरबार जिल्यातील हा सर्व भाग तसा अतिशय दुर्गम आणि आदिवासी वस्ती असलेला, इथले आदिवासी हे निसर्गाची पूजा करून निसर्गावरच उपजीविका करतात.
पण सध्या पोटा पाण्याची खळगी भरण्या साठी बरेच आदिवासी शहराकडे कामासाठी वळले आहेत. वर्षभर जरी आपल्या घरापासून दूर असले, तरी होळी जसजशी जवळ येते तस तसं त्यांची पावले आपल्या घराकडे वळू लागतात. आणि लाखो आदिवासी सातपुड्यातील पहिल्या होळीचा मान असलेल्या या काठी गावी एकत्र येऊन हा होलिकोत्सव जल्लोषात साजरा करतात.
होळी उभी करण्यासाठी हा खड्डा श्रमदानाने आणि कोणतेही हत्यार न वापरता फक्त हाताने माती काढून खोदला जातो. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत असे वेगवेगळे संघ येथे आपल्या घरापासूनचा प्रवास पायी करत इथपर्यंत पोहोचतात. आपलं श्रमदानाचं काम झालं कि ते त्या खड्या भोवती पारंपरिक पद्धतीने नृत्य करतात.
या उत्सवासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतून सुद्धा लोक पायी येथे येतात. कित्त्येक किलोमीटर चा प्रवास करून हे सर्व इथे आलेले असतात.
सर्व आदिवासी आपल्या पारंपरिक वेशात इथे आलेले असतात. लाखो लोक एकाच तालावर थिरकत असतात, वेगवेगळी वाद्य त्यात बिरी, तूर, मांदळ, टिपऱ्या, ढोल, टाळ तसेच अंगावर चांदीच्या नाण्यांच्या माळा, बांबू पासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट, फेटे आणि मुखवटे, कंबरेवर मोठे घुंगरू किंवा सुकलेले दोडकी आणि दुधी भोपळ्यांचे कामरपट्टे, हातात वेगवेगळे शस्त्र, अंगावर रंगीबेरंगी कपडे, असा त्यांनी वेष परिधान केलेला असतो. अंगावर आणि चेहऱ्यावर, राख किंवा नैसर्गिक रंगांनी रंगरंगोटी केलेली असते. या रात्री पुरुष मंडळी बुध्या बाबा, घेर, मोरख्या, कहांडोखा, मोडवी, शिकारी अशी वेगवेगळी रूप धारण करतात.
आपली परंपरा जपण्यासाठी हे सर्व लोक इथे आलेले असतात निसर्गाशी एकरूप होऊन आपल्याच धुंदीत असतात येथे आपल्याला अतिशय प्राचीन असलेल्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन होते. लाखोंची गर्दी जरी असली आणि कोणाचेही व्यवस्थापन नसताना सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा रात्रभर चालतो. वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज रात्रभर गुंजत असतात.
या होळीचा इतिहास तास ७५० वर्षांपेक्षा हि जुना आहे राजा उमेद सिंह यांनी १२४६ साली काठी हे राज्य स्थापन केले होते तेव्हा पासूनच या होळीची सुरुवात झाली होती. भारतातील सर्वात जुनी असलेली हि आदिवासींची होळी ७५० वर्षांनंतर सुद्धा काहीही बदल न होता तशीच पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते.
होळीचा बांबू सध्या गुजरात मधील जंगलातुन आणला जातो. काठी होळी, त्यात वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे. जंगलातील सर्वात उंच, म्हणजे जवळ जवळ ७० ते ९० फूट उंच असा बांबू या होळीसाठी वापरला जातो. हा बांबू कोणतीही अवजारे न वापरता जंगलातच मिळणाऱ्या काठ्या आणि हाताने माती काढून मुळासकट काढला जातो. नंतर कुठेही जमिनीवर न ठेवता, वाजत गाजत आणि अनवाणी काठी गावात आणला जातो. सर्वात अगोदर वडाच्या झाडाजवळ या बांबूची राज घराण्याकडून पूजा केली जाते. तसेच राजा उमेद सिंह यांची हत्यारं आणि आसनाची देखी पूजा केली जाते.
एकीकडे हि सर्व विधी चालू असताना दुसरीकडे होळीचा बांबू उभा करण्यासाठी खड्डा खोदण्याचे काम रात्रभर चालूच असते. हळू हळू जवळ जवळ ५ फूट खोल हा खड्डा बनवला जातो.
नंतर होळीचा बांबू इथे आणून त्याची पुन्हा एकदा पूजा केली जाते. खोबरं, हारकंगन, खजूर यांचा नैवेध्य दाखवला जातो. होळी खड्ड्याचे काम पूर्ण झालेले असते. आणि नंतर ज्याची सर्वजण प्रतीक्षा करत असतात ती होळी उभी करण्यात येते.
होळीचा बांबू अतिशय उंच असल्यामुळे त्याला उभ करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली जाते. इथे सुद्धा कोणतेही हत्यार न वापरता फक्त लाकडांच्या साहाय्याने होळी उभी केली जाते. यावेळी आणि होळी जाळल्यावर सुद्धा हा बांबू जमिनीवर पडायला द्यायचा नसतो. या बांबूला आंब्याची किंवा जांभळाची पाने लावली जातात.
आधीच्या होळीत ज्यांनी नवस केला असतो त्यांना होळीच्या पाच दिवस आधीपासूनच ब्रम्हचर्यत्व धारण करावे लागते. खाट अथवा पलंगावर न झोपता जमिनीवर झोपूनच या कार्यकाळात होळीला वंदना दिली जाते. विविध रुप धारण केलेले आदिवासी काठी होळीनंतर तब्बल आठ ठिकाणची होळी पायी जाऊन आपला नवस फेडून होलिकोत्सव साजरा करतात. पुढील पाच दिवस काकर्दे, मोलगी, तोरणमाळ, गौऱ्या, सुरवाणी, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, सुरवाणी, बुगवाडा अशा ठिकाणी होळी उत्सव साजरा होतो.
शेवटी पहाटे ५ ते ६ वाजता होळीला अग्नी दिली जाते. आलेले सर्व आदिवासी या होळीला प्रदक्षिणा घालतात. अतिशय भव्यदिव्य असा हा सोहळा उत्तरार्धात पोहोचलेला असतो, याची भव्यता इथे आल्याशिवाय तुम्हाला कधी समजणारच नाही. अतिशय विस्मयकारक अनुभव असतो हा, सध्या या सर्व गोष्टी अनुभवण्यासाठी इतर लोक हि काठी गावी पोहोचत आहेत.
सूर्योदय होईपर्यंत होळी जळतच असते. त्यानंतर आदिवासी होळीची थोडी राख स्वतः बरोबर घरी घेऊन जातात. ती राख ते पुढच्या होळी पर्यंत आपली घरी ठेवतात.
जसजसा सूर्य डोक्यावर येत जातो तसतसं प्रत्येक जण जमेल तसं आपल्या घरी आपल्या पाडयात निघून जातो. हळू हळू पूर्ण काठी गाव रिकामी होत जातं. राहतात फक्त या सोहळ्याच्या आठवणी